Yavatmal News: निर्माल्य विसर्जनासाठी गेलल्या काकूसह दोन पुतणींचा बुडून मृत्यू; पैनगंगा नदी पात्रातील घटना

Yavatmal News: निर्माल्य विसर्जनासाठी गेलल्या काकूसह दोन पुतणींचा बुडून मृत्यू; पैनगंगा नदी पात्रातील घटना

Yavatmal Crime News: निर्माल्य विसर्जनासाठी गेलेल्या दोन मुलींसह त्यांच्या काकूचा पैनगंगा नदी पात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. ही घटना यवतमाळच्या (Yavatmal News) आर्णी तालुक्यातील कवठाबाजार येथे घडली. प्रतीक्षा प्रवीण चौधरी (35), अक्षरा निलेश चौधरी (13) आणि आराध्य निलेश चौधरी (11) अशी मृतकांची नावे आहेत. अवैध रेती उत्खननामुळे पैनगंगा नदीपात्रात मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे पाण्याचा अंदाज न आल्याने एका चिमुकलीचा तोल जाऊन ती त्यात पडली. त्यानंतर तिला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी गेली. दोन्ही चिमुकल्या बुडत असल्याचे पाहून काकूने मदतीसाठी धाव घेतली. मात्र, त्या प्रयत्नात काकू देखील बुडाल्या. घटनेची माहिती मिळातच गावकऱ्यांनी नदीपात्राकडे धाव घेतली. परंतु तोपर्यंत तिघीही खोल खड्ड्यात बुडाल्या होत्या.

काकूसह दोन पुतणींचा बुडून मृत्यू

मिळालेल्या माहिती नुसार, काल शनिवारच्या संध्याकाळच्या सुमारास यवतमाळच्या कवठाबाजार येथे एका कुटुंबातील एक महिला आणि त्यांच्या दोन पुतण्या निर्माल्य नदीपात्रात वाहण्यासाठी गावातील पैनगंगा नदीकाठावर पोहोचल्या. येथे निर्माल्य विसर्जित करताना एका चिमुकलीचा तोल गेला आणि ती पाण्यात बुडत असल्याचे दिसून आले. त्यानंतर तिला वाचवण्यासाठी दुसरी मुलगीही गेली. मात्र तीला फार यश आले नाही आणि तीही बुडायला लागली. त्यानंतर दोन्ही चिमुकल्या बुडत असल्याचे पाहून काकूने मदतीसाठी धाव घेतली. मात्र त्यात त्यांचाही घात झाला आणि काकू देखील बुडाल्या.

पैनगंगा नदीपात्रातून दिवसरात्र रेतीचा उपसा केला जातो. या अवैधपद्धतीने रेती उत्खनन केल्यामुळे मोठमोठे खड्डे नदीपात्रात पडले आहेत. यामुळे नदीपात्रात अक्षरशः विहिरीच्या आकाराचे विवर तयार झाले आहेत. यात पाण्याचा प्रवाह फिरत असल्याने तेथे अंदाज येत नाही. यातूनच शनिवारची भीषण घटना घडल्याचे कवठाबाजार ग्रामस्थांनी सांगितले आहे. परिणामी या रेतीमाफियांमुळे नदीपात्र आता लोकांच्या जीवावर उठत असल्याचा आरोपही   ग्रामस्थांनी केला आहे.

रेतीमाफियांमुळे नदी उठली जीवावर

कालांतराने तिघीही बुडाल्याची बाब नदी तीरावर असलेल्या इतरांच्या लक्षात आली. त्यांनी आरडाओरडा करून मदतीची याचना केली असता ग्रामस्थ तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत तिघीही पाण्यात बुडाल्या होत्या. अखेर तिघींचेही मृतदेहच हाती लागले. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे. अवैध रेती उत्खननामुळे पैनगंगा नदीपात्रात मोठे खड्डे पडले आहेत. यातच बुडून दोन मुलींसह एका काकूचा मृत्यू झाला. तिघींचेही मृतदेह बाहेर काढून ग्रामस्थांनी शनिवारी रात्री तेथेच आंदोलन सुरू केले. अवैध रेती उत्खननाला जबाबदार तहसीलदार, मंडळाधिकारी, तलाठी यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तोपर्यंत मृतदेह उचलू देणार नाही, असा पवित्राही त्यांनी घेतला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

 

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने