Yavatmal News : डोळ्यात मिरची पुड टाकून सराफ व्यापाऱ्यांना लुटले; रोख रक्कमेसह 27 लाखांचा मुद्देमाल केला लंपास

Yavatmal News : डोळ्यात मिरची पुड टाकून सराफ व्यापाऱ्यांना लुटले; रोख रक्कमेसह 27 लाखांचा मुद्देमाल केला लंपास

यवतमाळ : डोळ्यात मिरची पुड फेकून बंदुकीच्या धाकावर अज्ञातांनी दोन सराफ व्यापाऱ्यांना लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  सराफ व्यापाऱ्यांकडून रोख रक्कमेसह 27 लाखांचा मुद्देमाल या दरोडेखोरांनी लंपास केला. ही घटना यवतमाळच्या (Yavatmal Crime)आर्णी तालुक्यातील सदोबा सावळी येथे सोमवाच्या सायंकाळी घडली. याप्रकरणी सराफा व्यावसायिकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी (Yavatmal Police)अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून रस्त्यावर लुटमारीच्या गुन्ह्याची वाढते प्रमाण आणि यापूर्वी झालेल्या गुन्ह्यांमधील आरोपींची पद्धत सारखीच असल्याने, यात कुठली टोळी सक्रिय असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत असून पोलीस त्या दिशेने या प्रकरणाचा तपास करीत आहे. 

27 लाखांचा मुद्देमाल केला लंपास 

यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी येथील रहिवासी असलेले सोनार विशाल देविदास लोळगे आणि रंजित काटे यांचे सावळी सदोबा येथे गोविंद ज्वेलर्स नामक सोने-चांदी विक्रीचे दुकान आहे. त्यामुळे हे दोघे आपल्या कारने दररोज ये-जा करतात. दरम्यान, सोमवारी सायंकाळच्या सुमारास ते सदोबा सावळी येथील दुकान बंद करून दुकानातील सोन्याचांदीचे दागिने आणि रोख घेवून आर्णीकडे परत जात होते. दरम्यान, कार सावळी रोडवरील विटाची भट्टी ते कुऱ्हा फाट्यादरम्यान आली असताना काही 4 ते 5 आज्ञातांनी त्यांची टाटा नेक्सान कंपनीची कार (कार क्र. एमएच 29 बीव्ही 7128) अडवली. त्यांनतर या व्यक्तीनी कारच्या काचा फोडून त्यातील रक्कम आणि दाग दागिने हिसकावण्याचा प्रयत्न केला.

मात्र विशाल आणि रंजितने त्यांना विरोध केला असता त्यातील एकाने विशाला बंदुकीचा धाक दाखवला, तेवढ्यात दुसऱ्याने या दोघांच्या डोळ्यात मिरची पूड फेकली. भर रस्त्यात सिनेस्टाईल पद्धतीने सुरू असलेल्या या प्रकारात 4 ते 5 आज्ञातांनी कार मधील बॅग घेऊन पळ काढला. या बॅगेत 1 लाख 80 हजाराची कॅश आणि 400 ग्रॅम सोने, असा एकूण 27 लाखांचा मुद्देमाल या दरोडेखोरांनी लंपास केला. 

लूटमार करणाऱ्यांचा शोध सुरू 

या घटनेनंतर भयभीत झालेल्या विशाल आणि रंजितने तत्काळ पोलीस स्टेशन गाठत घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर पोलिस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, उपविभागीय अधिकारी रजनीकांत चिलुमुला, एलसीबीचे पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनोने यांनी तत्काळ आर्णीतील घटनास्थळाला भेट दिली. त्यानंतर पोलिसांनी पुढील कायदेशी कारवाई करत या प्रकरणाच्या पुढील तपास सुरू केला आहे. मात्र जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून वारंवार होत असलेल्या या लूटमारच्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  

इतर महत्वाच्या बातम्या 

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने