Mumbai Crime : मुलींचा वापर करुन आई-वडील रचायचे हनीट्रॅप, लग्न करुन पैसेही उकळले, पण एका तक्रारीने बिंग फुटलं

Mumbai Crime : मुलींचा वापर करुन आई-वडील रचायचे हनीट्रॅप, लग्न करुन पैसेही उकळले, पण एका तक्रारीने बिंग फुटलं

मुंबई: शहरात वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या तरुणांना मैत्रीच्या जाळ्यात ओढून (Honey Trap) पैसे लुटणाऱ्या एका कुटुंबाच्या विरोधात आरे पोलीस स्टेशनमध्ये (Aarey Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाचा आदेशानंतर आरे पोलिसांनी दोन बहीणी आणि त्यांचा आई-वडिलांच्या विरोधात ॲट्रॉसिटी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं

आरे पोलीस स्टेशनच्या हद्दीत खाजगी कंपनीत नोकरी करणाऱ्या मुलाची ओळख तेथे काम करणाऱ्या मुलीसोबत झाली. संबंधित मुलगा कंपनीत कोऑर्डिनेटर म्हणून काम करत होता. या मुलाला मुलीने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. स्वतःच्या घरच्यांच्या विषयी खोटं सांगून मुलीने त्या मुलाची सहानुभूती मिळवली. इतकेच नाही तर त्या मुलाला त्याच्या कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन लग्न करण्यास भाग पाडले. 

विवाह झाल्यानंतर पैशांची मागणी

काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत त्या दोघांचा विवाह पार पडला. काही दिवसानंतर मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांनी मुलाकडे पैसे मागण्या सुरुवात केली. कधी रोख तरी कधी दागिने मागून मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांनी त्याला लुबाडायला सुरू केलं. 

एक कोटीपेक्षा महागड्या घराची मागणी

काही महिन्यानंतर मुलीच्या आईने त्या मुलाला एक कोटीपेक्षा अधिक किमतीचा फ्लॅट घेऊन तो मुलीच्या नावावर करण्यास सांगितला. बराच काळ कर्ज काढून त्यांच्या पैशांची मागणी पुरवणाऱ्या त्या मुलाला इतक्या मोठ्या किमतीच्या फ्लॅट घेणे अशक्य होते त्यांनी फ्लॅट घेणे जमणार नसल्याने सांगताच मुलगी आणि तिचा वडिलांनी मुलाला जातीवरून शिव्या घालण्यास सुरुवात केली. त्यासोबत मुलीला मुलासोबत राहण्यास मनाई केली.

कोर्टाने पोलिसांना झापलं

यानंतर पीडित मुलांने आरे पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. मात्र पोलिसांकडून मदत न मिळाल्यामुळे पीडित मुलाने कोर्टामध्ये धाव घेतली. संबंधित मुलाची तक्रार नोंद करून घेत नसल्याने कोर्टाने पोलिसांना चांगलंच झापलं. त्यांनंतर कोर्टाच्या आदेशाने आरे पोलिसांनी शेवटी त्या कुटुंबातील दोन बहीणी आणि त्यांच्या आई-वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

आतापर्यंत सहा तरुणांना गंडा घातला

या दोन्ही बहिणी आणि त्यांच्या आई-वडिलांनी आतापर्यंत सहा जणांपेक्षा जास्त तरुणांना लग्नाच्या नावाने लुटण्याचं समोर आलं आहे. सध्या आरे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तरुणांना लुटणाऱ्या कुटुंबीयाचा शोध सुरू केला. 

ही बातमी वाचा: 

 

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने