एसीबीची संभाजीनगरात मोठी कारवाई, दुय्यम निबंधकाच्या घरात तब्बल 1 कोटी 35 लाखांची कॅश मिळाली

एसीबीची संभाजीनगरात मोठी कारवाई, दुय्यम निबंधकाच्या घरात तब्बल 1 कोटी 35 लाखांची कॅश मिळाली

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात एसीबीने (ACB) मोठी कारवाई केली असून, दुय्यम निबंधकाला लाच घेतांना रंगेहात पकडले आहेत. धक्कादायक म्हणजे दुय्यम निबंधकाच्या घरात तब्बल 1 कोटी 35 लाखांची कॅश मिळून आल्याने खळबळ उडाली आहे. योगायोग म्हणजे बेकायदेशीर दस्त नोंदणी प्रकरणात या दुय्यम निबंधकाच्या निलंबनाचे आदेश सकाळी सिल्लोड कार्यालयात धडकले, त्याची अंमलबजावणी होण्यापर्वीच लाच घेतांना त्याला रंगेहात पकडण्यात आले. छगन उत्तमराव पाटील (वय 49 वर्ष, रा. छत्रपती संभाजीनगर) असे या अधिकाऱ्याचे नाव असून, तो सिल्लोड येथील नोंदणी कार्यालयात कार्यरत होता. 

अधिक माहितीनुसार, सिल्लोडच्या नोंदणी कार्यालयात दुय्यम निबंधक म्हणून छगन उत्तमराव पाटील कार्यरत आहेत. दरम्यान, सिल्लोड तालुक्यातील आमठाना येथील तक्रारदार व त्यांची भावजयी यांची धावडा शिवारातील गट क्रमांक 47/1 मध्ये सामाईक शेती आहे. या शेतीचा दस्त तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावे करण्यासाठी अर्ज करण्यात आला होता. मात्र दुय्यम निबंधक छगन पाटील याने 5 हजारांची मागणी केली. परंतु तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यामुळे एसीबीच्या पथकाने 1 मार्च रोजी दुपारी दुय्यम निबंधक कार्यालयातच सापळा लावला. यावेळी तक्रारदाराकडून 5 हजार रुपयाची लाच घेण्यात आली. या प्रकरणी छगन पाटील आणि स्टॅम्प वेंडर भीमराव किसन खरात या दोघांना रंगेहात पकडण्यात आले आहे.

घरात तब्बल 1 कोटी 35 लाखांची कॅश....

सिल्लोडच्या नोंदणी कार्यालयात दुय्यम निबंधक म्हणून कार्यरत असलेल्या छगन पाटील याला लाच घेतांना पकडण्यात आल्यावर, एसीबीच्या पथकाने तात्काळ त्याच्या घरावर छापेमारी केली. यावेळी कारवाईसाठी गेलेल्या पथकाला देखील धक्का बसला. कारण पाटील यांच्या घरात तब्बल 1 कोटी 35 लाखांची कॅश पथकाला मिळून आली आहे. पथकाने याबाबतचा पंचनामा केला असून, छगन पाटील यांना देखील अटक करण्यात आली आहे.

सकाळी निलंबनाचे आदेश, दुपारी लाच घेतांना अटक 

सिल्लोड नोंदणी कार्यालयाची नोंदणी विभागाने अंतर्गत तपासणी केली. त्यावेळी 7 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2023 या काळात तुकडेबंदी कायद्याचे उलंघन करून तब्बल 44 दस्तांची नोंदणी करण्यात आल्याचे समोर आले. यातील 42 दस्तांमध्ये मुल्यांकन कमी करून दस्तांची नोंदणी करीत 48 लाख 6 हजार 273 रुपयांचा शासनाचा महसूल बुडाल्याचे निदर्शनास आले. अशा प्रकारे एकूण 86 दस्तांमध्ये नोंदणी नियमांचा भंग केल्याचा ठपका चौकशी पथकाने पाटील याच्यावर ठेवला आहे. या चौकशी अहवालावरून 29  फेब्रुवारी 2024 रोजी पाटील यांना निलंबीत करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. विशेष म्हणजे निलंबनाचे आदेश सकाळी सिल्लोड कार्यालयात धडकले, त्याची अंमलबजावणी होण्यापर्वीच लाच घेतांना पाटील याला रंगेहात पकडण्यात आले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

शिंदे गटाच्या मंत्र्यांवर एमआयडीसी भूखंड घोटाळ्याचा आरोप; काय आहे नेमकं प्रकरण?

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने