Kota News : सॉरी, मम्मी-पप्पा, मी...; परीक्षेच्या एक दिवसआधीच विद्यार्थीनीने संपवलं आयुष्य

Kota News : सॉरी, मम्मी-पप्पा, मी...; परीक्षेच्या एक दिवसआधीच विद्यार्थीनीने संपवलं आयुष्य

Kota Case :  देशभरातील विद्यार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी 'परीक्षा पर चर्चा' या कार्यक्रमातून तणावापासून दूर राहण्याचा सल्ला देत असताना दुसरीकडे  राजस्थानमधील कोचिंग क्लासचे शहर म्हणून ओळख असलेल्या कोटा मध्ये आणखी एका विद्यार्थीनीने गळफास घेत आत्महत्या केली.ही विद्यार्थीनी जेईई मेन परीक्षेची तयारी करत होती. 30 जानेवारी रोजी JEE मुख्य परीक्षा होती. निहारिका सिंह असे या आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थीनीचे नाव होते. ती बारावीमध्ये शिकत होती. 

राहत्या घरीच उचलले टोकाचे पाऊल... 


विद्यार्थिनीच्या खोलीत एक सुसाईड नोटही सापडली असून, त्यात तिने लिहिले आहे की, 'माफ करा आई आणि बाबा, मी जेईईची तयारी करू शकले नाही, त्यामुळेच मी आत्महत्या करत आहे.' बोरखेडा पोलिस स्टेशनचे एएसआय रेवतीरामन यांनी मीडियाला सांगितले की, शिवमंदिर 120  फूट रोड बोरखेडा येथील रहिवासी विजय सिंह यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यांची मुलगी निहारिका ही 18 वर्षांची होती. बारावीत शिकत होती.तिची जेईई अॅडव्हानसची मंगळवारी परीक्षा होती. मात्र, तिने आज सोमवारीच घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

गळफास  घेतलेल्या अवस्थेत असलेल्या निहारिकाला तातडीने  रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. अभ्यासामुळे ती तणावाखाली असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. कुटुंबीयांच्या जबाबानंतर पोलीस पुढील कारवाई करणार आहेत.

सुसाईड नोटमध्ये काय?

निहारिकाने आत्महत्येपूर्वी  सुसाईड नोट लिहून ठेवली होती. 'मम्मी, पप्पा, मी जेईई करू शकलो नाही, म्हणूनच मी आत्महत्या करत आहे, मी हरली आहे, मी चांगली मुलगी नाही. माफ करा आई आणि बाबा, असे निहारिकाने सुसाईड नोटमध्ये म्हटले. 

चुलत भाऊ विक्रमने माध्यमांना सांगितले की, निहारिका तीन बहिणींमध्ये सर्वात मोठी होती. वडील विजय बँकेत सुरक्षारक्षक आहेत. विजय सकाळी ड्युटीसाठी निघाले. निहारिका दुसऱ्या मजल्यावर तिच्या खोलीत अभ्यास करत होती. घरातील इतर सदस्य खाली होते. सकाळी दहाच्या सुमारास आजीने खोलीचा दरवाजा ठोठावला. निहारिकाने दरवाजा उघडला नाही. आजीने ओरडून सर्वांना बोलावले. आम्ही  पोहोचलो तेव्हा तिने गळफास घेतला होता. 

2023 मध्ये 29 विद्यार्थ्यांच्या आत्महत्या 

शिक्षणाचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोटामध्ये नैराश्येपोटी विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना वाढल्या आहेत. मात्र, याला आळा घालण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रेरणा देण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. 2023 मध्ये 29 विद्यार्थ्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले.

आत्महत्या हा पर्याय नाही...

नैराश्य, तणावात अनेकजण  टोकाचे पाऊल उचलत आहेत. मात्र, आयुष्याची अखेर करणे हा पर्याय असू शकत नाही. तणावात असल्यास कुटुंबातील सदस्य, शिक्षक, मित्र, समुपदेशक यांच्याशी चर्चा करा. 
त्याशिवाय, तणावात असल्यास 9152987821 या हेल्पालाईन क्रमांकावर संपर्क साधावा.त्याशिवाय, हितगुज हेल्पलाइनच्या 022- 24131212 या क्रमांकावर संपर्क साधावा. 

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने