शौचालयाच्या सांडपाण्यावरून चंद्रपुरात महिलेची हत्या

शौचालयाच्या सांडपाण्यावरून चंद्रपुरात महिलेची हत्या

Chandrapur crime news



भिसी - शंकरपूर महामार्गांवरील आंबोली या गावात शुक्रवारी रात्री साडेसात वाजताच्या दरम्यान सांडपाण्याच्या जुन्या किरकोळ वादाचा राग मनात धरून 34 वर्षीय युवकाने शेजारी राहणाऱ्या 45 वर्षीय महिलेच्या डोक्यावर काठीने वार केला. यात महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला.




महिलेला मारहाण होत असतांना तिचा मुलगा आईला वाचविण्यासाठी गेला असता आरोपीने मृतक महिलेच्या मुलालाही काठीने मारहाण केली. यात मुलाच्या हाताला जबर दुखापत झाली. शारदा दयाराम वाघ ( वय - 45, रा. आंबोली, ता. चिमूर ) असे मृतक महिलेचे नाव असून जखमी मुलाचे नाव मोहन दयाराम वाघ ( वय - 26 ) आहे. अटक झालेल्या आरोपीचे नाव गोपीचंद संपत शिवरकर ( वय - 34, रा. आंबोली, ता. चिमूर ) आहे.


फिर्यादी मोहन दयाराम वाघ यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी गोपीचंद शिवरकर व मृतक शारदा वाघ यांच्या कुटुंबात संडासच्या सांडपाण्याच्या कारणावरून नेहमी भांडण व्हायचे. गोपीचंद शिवरकर यांच्या घरातील संडासचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी शारदा वाघ यांच्या घरी येते.

या कारणामुळे नेहमी होणाऱ्या भांडणाचा राग मनात धरून16 जूनच्या रात्री साडेसात वाजताच्या दरम्यान गोपीचंद शिवरकर लपत-छपत, हातात काठी ( दांडा ) पकडून शारदा वाघ यांच्या अंगणात आला. त्यावेळी शारदा दयाराम वाघ त्यांच्या घरच्या अंगणात बसल्या होत्या. त्यांचा मुलगा मोहन वाघ हा सबलीने ( खंती ) सायवानासाठी खड्डे खनत होता. आरोपी गोपीचंदने शारदाच्या डोक्यावर दांड्याने जबर वार केला.

मोहन आईच्या बचावासाठी धावला असता गोपीचंदने मोहनलाही दांड्याने मारले. मोहनच्या हाताला जबर दुखापत झाली.
जीव वाचवण्यासाठी मोहन पळाला. गोपीचंदने मोहनचा पाठलाग केला. मोहन गावातील सिद्धार्थ भषारकर यांच्या घरात लपला. तेथून मागच्या दाराने निघाला व नागदेवते यांच्या संडासात लपला. काही वेळाने गावकऱ्यांनी मोहनला त्याच्या आईचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची बातमी सांगितली.


घटनेची माहिती मिळताच चिमुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांच्या नेतृत्वात भिसी पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश राऊत, पोलीस उपनिरीक्षक सचिन जंगम, पो. उप.नि. चहांदे पोलीस ताफ्यासह तत्काळ घटनास्थळी पोहचले व आरोपीला त्वरित अटक केली.

फिर्यादी मोहन वाघ हा अनुसूचित जमातीचा असल्यामुळे आरोपीवर पोलिसांनी अनुसूचित जाती - जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा ( ऍट्रॉसिटी ) व भा. दं. वि. च्या कलम 302, 324, 447 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास चिमुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव करीत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने